Mandal New Year begins on July 1st, 2018 and ends on June 30th, 2019. New Year Membership is now OPEN.

About Us

कला-गुणांना सावली देणाऱ्या, परदेशी आलेल्या मराठी मनांना एकत्र आणणाऱ्या आपल्या डॅलस फोर्ट वर्थ मराठी मंडळाचा श्री गणेश झाला तो १९८६ साली लाडक्या बाप्पाच्या आगमनाने.

श्री दिलीप पाटणकर, श्री अतुल आपटे, श्री रमेश लोहारीकर, श्री हेमंत ओझरकर आणि श्री सुभाष दामले यांच्या पुढाकाराने त्या वेळी काही मराठी कुटुंबांनी संघटित होऊन मंडळाची स्थापना केली. दूरदेशी डॅलस मध्ये आपली माणसं शोधणाऱ्या मराठी मित्रांना सण-समारंभांना एकत्र येण्याकरिता हक्काचं ठिकाण मिळालं आणि सुख-दुःखं वाटणारं एक मोठं कुटुंब रुपाला आलं.

१९८७ साली मंडळाच्या कामकाजाची नियमावली ठरवली गेली, आणि या वृक्षाचं बीज रोवलं गेलं. सकस विचार आणि निस्वार्थ कार्य करणारे अनेक हात एकत्र आले आणि मंडळाला बळकटी येत गेली. धुरा वाहणारे खांदे बदलत राहिले तरी बहूहित जपणारी विचारशैली मात्र कायम राहिली. नियमावलीमध्ये कालांतरानुरूप बदल करण्यात आले. मंडळाची कुवत आणि कुमक वाढू लागली सर्वसमावेशक कार्यक्रमांची आखणी होऊ लागली. इतर शहरातील मंडळांबरोबर विचार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण होऊ लागली. मराठी शाळे च्या माध्यमातून इथे वाढणाऱ्या मुलांना आपल्या भाषेबद्दलची गोडी लावण्यात आली. लहान मुलांना आपल्या सारखी मूल्यं आणि जीवनशैली असलेले मित्र-मैत्रिणी भेटू लागले. मनोरंजन व विरुंगुळाच्या पलीकडे जाऊन आपले मंडळ डॅलस - फोर्टवोर्थ मध्ये कला व मराठी संस्कृती च्या वाढीस हातभार लावत आहे. शिवजयंती सारखा महाराजांच्या जीवनाच्या आणि मराठी साम्राज्याचा यशोगाथेचा उत्सव संपूर्ण उत्तर अमेरिकेत फक्त आपले मंडळ साजरे करतो. त्याच बरोबर उत्तरांग आणि मराठी शाळा ह्या सारख्या BMM च्या उपक्रमानं मध्ये सहभागी होऊन मराठी वारशाची जपवणूक आणि घडवणुकीत हातभार लावत आहे.

दिवसागणिक दिवस सारत गेले आणि आपले मंडळ पाहतापाहता ३१ वर्षाचं झालं. २५ कुटुंबांनी सुरु केलेलं मंडळ आज ४५० कुटुंबांनी स्वीकारलं आहे. १००० च्या वर सदस्य असलेले आपले मंडळ आता BMM च्या मोठ्या गटात गणलं जात. मंडळाच्या ह्या सर्वांगीण प्रगतीमुळे आणि आजपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचा कष्टाचे व सदस्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून BMM चे १९ वे द्वैवार्षिक अधिवेशन सण २०१९ साली भरवण्याचा मान DFWMM ला पहिल्यांदाच मिळत आहे.

आपण सर्व मराठी मंडळींनीं आपल्या मंडळाला असेच सहकार्य करत राहावे आणि DFW मधील मराठी मनानं एकत्र आणणार हे व्यासपीठ टिकून ठेवावे हे नम्र विनंती.